Department of Marathi

About Department

 

Department of Marathi

      विश्वातील सर्व धर्मांच्या तत्वज्ञानाचे सुलभीकरण करणारी प्रार्थना लिहिणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्वातंत्र्योत्तर काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी खेड्या-पाड्यात, वाड्या-वस्त्यांवर विस्तारलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था १९५४ साली स्थापन केली. या संस्थेचे  ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार’ हे ध्येयवाक्य घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाखाविस्ताराच्या कार्यात जून १९६९ मध्ये इचलकरंजी येथे आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजची स्थापना झाली. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून सूत आणि कपड्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या औद्योगिक शहरात जीवनानुभव घेणाऱ्या कष्टकरी तरुण मनावर साहित्य व भाषेचे संस्कार करत सुशिक्षित, सुसंस्कारी समाज घडवत असताना इचलकरंजीतील साहित्य आणि साहित्येतर कला जोपासून परंपरा अधिक समृद्ध करणारा मराठी विभाग १९६९ पासून कार्यरत आहे. इचलकरंजीच्या जडणघडणीत सहकाराच्या माध्यमातून योगदान देणारे सहकारमहर्षी माजी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या कृतज्ञतेपोटी आज हे महाविद्यालय दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. महाविद्यालयात  सन २००८ पासून पदव्युत्तर मराठी विभाग कार्यरत असून या विभागाचे इचलकरंजी व परिसरात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे.

      मराठी विभागाचा पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिवाजी विद्यापीठ परीक्षेचा निकाल ८० % पेक्षा अधिक असून कु. अनिता विठ्ठल चौधरी या विद्यार्थिनीने मे, २०२१ मध्ये झालेल्या एम. ए. भाग - २ शिवाजी विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविले. तर रोहित प्रकाश शिंगे हा विद्यार्थी ऑक्टोबर, २०२२ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) मध्ये उत्तीर्ण झाला. तसेच  नोव्हेंबर, २०२३ मध्ये आंतरविभागीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत वेट लिफ्टिंगमध्ये रोहित आंबोळे या विद्यार्थ्याने रजत पदक पटकविले.   

     विभागाच्यावतीने  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक अशा विविध पातळीवर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्याचा प्रयत्न केला जातो. श्रवण, वाचन, भाषण, लेखन इ. कौशल्ये तसेच रसग्रहणात्मक व सर्जनशील उपक्रमातून वाङ्मयीन व भाषिक उद्दिष्ट्ये साध्य करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो. विभागामार्फत कविसंमेलन, साहित्यिक भेट-संवाद, साहित्यिक मुलाखत,  पुस्तक प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ चर्चा, भित्तीपत्रिका अनावरण, ‘विवेक’ वार्षिक नियतकालिक संपादन इ. उपक्रम, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, भारतीय भाषा दिवस, बाळशास्त्री जांभेकर जयंती - पत्रकार दिन, विवेकानंद जयंती सप्ताह, ज्ञानशिदोरी दिन, इ. कार्यक्रमांच्या निमित्ताने निबंध, वक्तृत्त्व, अभिवाचन इ. स्पर्धा व अभ्यागत व्याख्यान यांचे आयोजन केले जाते.

     तसेच विभागामार्फत  विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुलभीकरण, प्रात्यक्षिक अनुभव, सामाजिक भान व साहित्यविषयक जाणिवा प्रगल्भ होण्याच्यादृष्टीने कारदगा साहित्य संमेलन, महानुभाव मठ – सातारा, प्रिंट ओम ऑफसेट – सातारा, विश्वकोश निर्मिती मंडळ – वाई, पुस्तकाचे गाव – भिलार, खिद्रापूर, समाजवादी प्रबोधिनी वाचनालय इचलकरंजी, तेजश्री प्रकाशन इचलकरंजी, चर्च, इ. ठिकाणी क्षेत्रीय भेटींचे आयोजन करण्यात आले.  

     विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी विभागास सुप्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार श्री. विघ्नेश जोशी, संपादक श्री. प्रसाद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त श्री. राजन मुठाणे, साहित्यिक, समीक्षक डॉ. रवींद्र ठाकूर, कविवर्य अरुण म्हात्रे, कविवर्य महेश केळुसकर, कविवर्य शशिकांत तिरोडकर, कविवर्य वसंत पाटील, ज्येष्ठ कवी पाटलोबा पाटील, साहित्यिक रफिक सुरज मुल्ला, कवी युवराज मोहिते, कथाकार व कवयित्री नीलम माणगावे, कवयित्री वैशाली नायकवडे प्रा. राजा माळगी,  प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा. अशोक दास, प्रा. शांताराम कांबळे इ. साहित्यिक मान्यवरांनी भेटी दिल्या. विभागाच्या विविध उपक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजी, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, मनोरंजन मंडळ इचलकरंजी, साहित्य विकास मंडळ कारदगा,  डोंगरी साहित्य परिषद शिराळा, इ. विविध संस्थांचे सहकार्य लाभले.  

     मराठी विभागास संस्था कार्याध्यक्ष मा. अभयकुमार साळुंखे साहेब, सचिव सौ. शुभांगी गावडे मॅडम, कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, सहसचिव प्रशासन डॉ. आर. व्ही. शेजवळ, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे, प्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.  

 

 

दृष्टी  (Vision)

 

भाषा आणि साहित्याचे अध्ययन करणे.

मराठी भाषेतील अर्थार्जनाच्या संधींसाठी अवकाश तयार करणे.

 

 

ध्येय  (Mission)

 

सर्जनशील लेखन, उपयोजित आणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.

नवीन पिढीमध्ये साहित्याची जाण विकसित करणे.

जागतिकीकरणानंतरच्या नवउद्योग व्यवसाय आणि दृक श्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे.
मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे.

मराठी भाषेसंबंधी भाषावैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.

 

 

 

उद्दिष्ट्ये (Objectives)

 

साहित्याची अभिरुची निर्माण करणे.

साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.

भाषिक आणि वाङ्‌मयीन कौशल्ये विकसित करणे.

भाषा आणि साहित्य संशोधनाची पार्श्वभूमी तयार करणे.
वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास प्रेरणा देणे.

स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक व ऐच्छिक मराठी अभ्यासक्रमाचा परिचय करून देणे.

राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी निर्माण करणे. 


 

 

 

 

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default